मुंबई

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा…

मुंबई – अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. यामुळे आता अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली होती. त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृष्यप्रालीद्वारे), आमदार प्रसाद लाड, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलींद बोरीकर, उपसचिव अजित कवडे, अवर सचिव अरविंद शेटे, अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, उपाध्यक्ष विलास सावंत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढतांना त्यामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ हे ६३५ चौरस फूट पेक्षा जास्त असावे, भविष्याच्यादृष्टीने सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावी, सदनिकेची किंमत खुल्या बाजारभावानुसार असावी अशा अटी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेवून पुनर्विकास प्रकल्पाची निविदा लवकरात लवकर काढा, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

विधानपरिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांनी अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी राज्य शासन घेत असलेल्या निर्णयाबाबत शासनाचे विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या निर्णयामुळे सुमारे अभ्युदय नगर वसाहतीतील १५ हजार रहिवाशांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील मराठी माणूस, कामगार आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी स्ट्रक्चरलचे पैसे भरले आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून ओळखला जावा. काँक्रीटचे जंगल न होता चांगले काम व्हावे अशी मागणी करुन शासनाच्या क्रांतीकारक निर्णयांचे कौतुक महासंघाच्या प्रतिनिधींनी यावेळी केले.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करुन प्रकल्पाविषयी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page