चोरीचे मोबाईल, वाहनाची बॅटरी विक्री करण्यासाठी आलेले दोघे जेरबंद…
डोंबिवली – भंगार दुकानातील कामगारांचे मोबाईल आणि वाहनाची बॅटरी चोरून हे सर्व विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा घटक ३ कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. अनुराग सुनिल मंडराई आणि इरफान बाबु शेख अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ५ मोबाईल व १ तीन चाकी वाहनाची बॅटरी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दोन इसम चोरीचे मोबाईल आणि चोरी केलेली बॅटरी विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी गुन्हे शाखेचे सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यानुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कोळेगाव रोडच्या बाजूला, कल्याण शिळ फाटा रोड येथे सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मोबाईल हे सोनारपाडा, डोंबिवली पुर्व येथील भंगार दुकानात झोपलेल्या कामगारांचे चोरी केले आणि बॅटरी याच भंगार दुकानात पार्क केलेल्या एका तीन चाकी गाडीची चोरली असून सदर मोबाईल व बॅटरी विक्री करण्याकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांकडून एकूण ५०,१००/- रू. किमंतीचे ५ मोबाईल व १ तीन चाकी वाहनाची बॅटरी असा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच या दोघांना मुद्देमालासह मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, इरफान बाबू शेख वर मानपाडा, डोंबिवली आणि टिळक नगर पोलीस स्टेशन येथे एकूण घरफोडी चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत, तर अनुराग सुनिल मंडराई याच्यावर देखील वरील पोलीस स्टेशन प्रमाणे घरफोडी चोरीचे ५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि/संतोष उगलमुगले, सहा. पोलीस उपनिरीक्षक/दत्ताराम भोसले, पोहवा/विश्वास माने, पोना/दिपक महाजन, पो.कॉ./गुरूनाथ जरग, पो.कॉ. मिथुन राठोड, पो.कॉ. विजेंद्र नवसारे, पो.कॉ. उमेश जाधव, पो. कॉ. सतिश सोनावणे यांनी केलली आहे.