वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता…
मुंबई – गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यातील ६२.५७ टीएमसी पाणी बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा उपखोऱ्यात वळविण्यात येणाऱ्या वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
या प्रकल्पाचे ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर लाभक्षेत्र असून ते नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यातील आहे. या प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणे, ६ अस्तित्वातील धरणाची उंची वाढ तसेच ४२६.५४ कि.मी लांबीचा जोड कालवा देखील प्रास्तावित आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पना व वैधानिक मान्यतेसाठीच्या कामासाठी १ हजार २३२ कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता तर प्रकल्प बांधकामासाठी ८७ हजार ३४३ कोटी रकमेस तत्वतः प्रशासकीय मान्यता आहे.
या प्रकल्पामध्ये नागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ९२ हजार ३२६ हेक्टर, वर्धा जिल्ह्यातील ३ तालुक्यातील ५६ हजार ६४६ हेक्टर, अमरावती जिल्ह्यातील २ तालुक्यातील ८३ हजार ५७१ हेक्टर, अकोला जिल्ह्यातील २ तालुक्यातील ८४ हजार ६२५ हेक्टर, बुलढाणा जिल्ह्यातील २ तालुक्यातील ३८ हजार २१४ हेक्टर आणि यवतमाळ जिल्ह्यातील २ तालुक्यातील १५ हजार ८९५ हेक्टर असे ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या प्रकल्पाचे गोसीखुर्द ते निम्न वर्धा १.४९ लाख हेक्टर, निम्न वर्धा ते काटेपूर्णा १.४० लाख हेक्टर आणि काटेपूर्णा ते नळगंगा ०.८२ लाख हेक्टर क्षेत्र असे तीन टप्पे आहेत. कालव्यावर सात ठिकाणी १३.८३ कि.मी लांबीचे बोगदे तर ११ ठिकाणी २५.९८७ कि.मी लांबीचे पाईप असून ६ उपसा प्रस्तावित आहेत.
या प्रकल्पातून सिंचनासाठी ४५.४२ टीएमसी, घरगुतीसाठी १.१३ टीएमसी आणि औद्योगिकसाठी १४.०१ टीएमसी पाणी वापरले जाणार आहे.