मुंबई

मुंबईत ३०० मिलीमीटर एवढा पाऊस; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा… 

मुंबई – हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहल, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण कक्षातून मुंबईतील विविध भागातील पावसाची माहिती घेतानाच महामार्ग, रेल्वे, प्रमुख रस्ते येथील परिस्थितीचा देखील आढावा घेतला. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, एरवी मुंबईत ६५ मिलीमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मेठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुना भट्टी, सायन या भागात पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महापालिकेने पंप बसविले आहेत.एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या होल्डींग पाँण्डस् मुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळपासून मी रेल्वे, मुंबई महापालिका, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील सुमारे ५००० ठिकाणांवर मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page