सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात…

नवी मुंबई – कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. सागर कुमार टकले आणि प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर अशी या दोघांची नावे आहेत.
जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टकले यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. आणि तडजोडी अंती ४० हजार रुपये लाच स्वीकारली.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांच्या चुलत्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत से-Say सादर करण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टकले यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबी कार्य़ालयात जाऊन तक्रार केली. एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सागर टकले यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ४० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
सागर टकले यांनी लाचेची रक्कम पोलीस नाईक प्रज्ञेश कोठेकर यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार केलेल्या सापळा कारवाईत कोठेकर यांना तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.