डोंबिवलीत रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती…

डोंबिवली – पावसाळ्यात रस्ते अपघात टाळ्ण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी यासाठी डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून जनजागृती करण्यात आली.

हे करावे आणि हे करू नये तसेच अचानक वाहने बंद पडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक वाहनचालकाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मंदार धर्माधिकारी,सहायक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग यांच्या उपस्थितीत म्हसोबा चौक, डोंबिवली पूर्व येथे माहितीपत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आल्याची माहिती डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.

तसेच Flash deployment कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 181 वाहनचालकांवर ई चलन कारवाई द्वारे 1,01,000/- रूपये दंड आकारला असून त्यापैकी 23,300/- रूपये दंड जागीच वसूल करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पावसाळ्यात अचानक रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून सर्व डोंबिवलीकरांना करण्यात आले आहे.