महाराष्ट्र

नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार…

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेते हि घोषणा केली.

भुजबळ म्हणाले, होळीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. त्यावेळी खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील तिथे उपस्थित होते. त्यांनी मला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली असल्याचे सांगितले. तसेच या बैठकीत नाशिकचा मतदारसंघ आपल्याला मिळाला असून तुम्ही याठिकाणी उमेदवारीची तयारी करा, असे आदेशच अजित पवार यांनी मला दिले. मात्र याठिकाणी समीर भुजबळ हे योग्य उमेदवार आहेत, असेही मी अजित पवारांना सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले. समीर भुजबळ यांचा पर्याय आपण अमित शाह यांच्यासमोर ठेवला होता. मात्र अमित शाह यांनी तुम्हीच (छगन भुजबळ) याठिकाणाहून लढावे, असा सल्ला दिल्याचा निरोप अजित पवारांनी मला दिला. तसेच अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानेच तुमचे नाव सांगितले आहे, असेही अजित पवारांनी मला सांगितले.

नाशिकमध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असून हा मतदारसंघ त्यांच्या वाट्यातला आहे, अशीही आठवण छगन भुजबळ यांनी करून दिली. मात्र आम्ही शिवसेनेची समजूत घालू, असा शब्द अमित शाह यांनी आम्हाला दिला असल्याचे अजित पवार मला म्हणाले, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मला तर विश्वासच बसत नव्हता. म्हणून मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत विचारले. तर त्यांनीही अमित शाहांचा निरोप असून मला निवडणूक लढवावी लागेल, असे सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही विचारले तर त्यांनीही हेच सांगितले. तसेच माझे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचविले होते. त्यामुळे अमित शाह यांनी तुमच्या नावाचा आग्रह धरला, असेही बावनकुळे म्हणाले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

होळी होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. उमेदवारी देणार हे स्पष्ट असताना पुन्हा एकदा चर्चा का सुरू झाल्या? हे कळायला मार्ग नाही. महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला असून ते प्रचाराच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे महायुतीने नाशिकबाबत ताबडतोब निर्णय घ्यायला हवा होता. तो निर्णय का होऊ शकला नाही? याबाबत आता मला भाष्य करायचे नाही. मी नाशिकची संदिग्धता कायमची दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मी आज उमेदवारीतून माघार घेत आहे, असे छगन भुजबळ यांनी जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page