४ गावठी पिस्टल व ५९ जिवंत काडतूस हस्तगत…
मुंबई – ४ गावठी पिस्टल व ५९ जिवंत काडतूस गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमिरा पोलिसांनी हस्तगत करून दोघांना अटक केली. फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी आणि शाकीर अब्दुल वहाब चौधरी अशी या दोघांची नावे आहेत.
गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणाऱ्या अलम स्टील अँड फर्नीचर येथे काम करणाऱ्या इसमांकडे विनापरवाना पिस्टल व जिवंत राउंड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी याच्याकडे १ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतूस तर शाकीर अब्दुल वहाब चौधरी यांच्याकडे १ गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतूस मिळून आले. सदर बाबत पोलिसांनी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
दरम्यान त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत फिरोज ऊर्फ इब्राहीम आलम शफीऊल्ला चौधरी याला आपल्या ३ प्रतिस्पर्ध्यांमुळे व्यवसायात खूप नुकसान झाले. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्याच्या उद्देशाने त्यांनी ठाण्यातून ६ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे मागवून त्यापैकी २ गावठी पिस्टल व जिवंत राऊंड अमान स्टिल किचन इक्वीपमेंट या दुकानात ठेवले तर दोन पिस्टल व १२ राऊंड त्याने एका बॅगेमध्ये ठेऊन ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेकून दिले. तसेच त्यांच्याकडे सापडलेले पिस्टल व राऊंड ते एक दोन दिवसात कमिल खान ऊर्फ कलिम याच्या दुकानात ठेवणार होते. तसेच शाकीर अब्दुल वहाब चौधरी यांच्याकडे मिळून आलेले पिस्टल व राऊंड ते एक दोन दिवसात शादाब याच्या दुकानात ठेवणार होते अशी माहीती समोर आली आहे.
सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ गावठी पिस्टल व ५९ जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत.