फार्महाऊसवर पोलिसांचा छापा, ११ कोटींचे एमडी जप्त…

mumbai – कर्जत तालुक्यातील किकवी येथे शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी किकवी येथील सावली फार्म हाऊसवर धाड टाकत अंदाजे ११ कोटींचे पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली असून, एकूण २५ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि १ कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त केला आहे.
माहितीनुसार, याआधी पोलिसांनी मार्चमध्ये ४५ ग्रॅम एमडी जप्त केले त्यानंतर पाच जणांना अटक करून १३ कोटी रुपयांचे एमडी जप्त केले. तपासादरम्यान कर्जत तालुक्यातील किकवी येथील सावली फार्म हाऊसवर ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, त्याठिकाणी ११ कोटींचे पाच किलो एमडी ड्रग्ज आणि १ कोटी रुपयांचा कच्चा माल मिळून आला. पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन तेथून ११ कोटींचे एमडी आणि सुमारे एक कोटींचा कच्चा माल जप्त केला.
दरम्यान, याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.