ठाणे

रॅगिंग प्रकरणी ९ विद्यार्थ्यांवर कारवाई…

ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयाच्या वसतिगृहात, एमबीबीएसला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्या प्रकरणी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या ९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंग करणाऱ्या विदयार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांना एका शैक्षणिक सत्रासाठी कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे.

वसतिगृहात रॅगिंगसारखा प्रकार होतो ही निंदनीय बाब आहे. याबाबत विहित प्रक्रियेचा अवलंब करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या माध्यमातून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
त्याचबरोबर, कोणत्याही प्रकारे रॅगिंगसारख्या घटना होऊ नयेत, यासाठी सर्व विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधण्यात येत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा असा कोणी छळ करत असेल तर त्याची तत्काळ तक्रार करण्यात यावी, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्याची माहिती राजीव गांधी वैद्यकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता यांनी दिली.

वसतिगृहात रॅगिंग झाल्याची तक्रार करणारा ईमेल सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यासंदर्भात, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांनीही राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता यांना या ईमेल द्वारे सूचित करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी रँगिग प्रतिबंधक समितीच्या सहाय्याने तपास केला. त्यात, नव्याने एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, प्रथम व द्वितीय वर्षातील एमबीबीएसमध्ये शिकत असलेल्या विदयार्थ्यांनी मुलांच्या वसतिगृहात रॅगिंग केलेले असल्याचे निदर्शनास आले.

रँगिग प्रतिबंधक समितीने या संदर्भात कसून चौकशी करून प्रथम व द्वितीय वर्षातील दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. रॅगिंग करणाऱ्या विदयार्थ्यांना वसतिगृहातून कायमस्वरुपी बेदखल करण्यात आले आहे. तसेच, एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालयातून निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्च शिक्षण संस्थांमधील रॅगिंग प्रतिबंधक नियमावली-२००९च्या अधीन राहून करण्यात आली आहे.

रँगिग प्रतिबंधक नियमानुसार कारवाई पूर्ण करून तसा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली कळविण्यात आला. रँगिग प्रतिबंधक नियमानुसार तात्काळ केलेल्या अंमलबजावणीसाठी रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी, प्रशासनाने केलेल्या कारवाईबद्दल समाधानी असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांना कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page