मुंबई

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड…

मुंबई – वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

या विधेयकावर बोलतांना वनमंत्री मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईत भरघोस वाढ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.

या विधेयकावर बोलतांना विधान सभा आणि विधान परिषदेत सर्वपक्षीय विविध सदस्यांनी चर्चेत भाग घेत विधायक सूचना मांडल्या. याबद्दल वनमंत्री मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. या सूचनांमधील अनेक गोष्टी विधेयकांच्या थेट कक्षेत येत नसल्याने आमदारांच्या सूचनांसंदर्भात एक व्यापक व विस्तृत बैठक अधिवेशन संपल्यानंतर लवकरच आयोजित करण्यात येईल, असेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य व पाळीव प्राण्यांची प्राणहानी होते. तसेच गंभीर इजा ही होते. त्याचप्रमाणे शेती, फळबागा तसेच घरांचे नुकसानही होते. या सर्व प्रकारच्या नुकसानाच्या व्याख्या करून त्यांची भरपाईची रक्कम भरघोस वाढविण्याकरता प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, जी काही नुकसान भरपाई पिडितास मिळते ती देखील 30 दिवसांत मिळाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरून भरपाईच्या रकमेवरचे व्याज त्याच्याकडून वसूल करून पीडितास देण्याची तरतूद आज मंजूर झालेल्या विधेयकात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत या विषयावर बोलतांना मंत्री मुनगंटीवार यांनी याविषयावर रचनात्मक सूचना केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. ‘जंगल से जीवन के मंगल तक’ हे वन विभागाचे ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर वन समित्या बनत आहेत, त्या समित्यांवर स्थानिक विधान परिषद सदस्यांना उपाध्यक्ष म्हणून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जुन्नर येथे बिबट सफारी स्थापणार

विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जुन्नर येथे बिबट सफारी स्थापण्यात येईल. या बिबट सफारीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांना सांगितले.

सह्याद्रीत वाघांचे स्थानांतरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

विदर्भ ही जगाची व्याघ्र राजधानी झाली आहे. मात्र, आता वाघांची संख्या इतकी वाढली आहे की, उपलब्ध वनांमधील क्षेत्र वाघांना पुरत नाही. त्यामुळे अतिरिक्त वाघांचे स्थानांतरण इतरत्र करण्याचा विचार सुरू आहे, त्यात सह्याद्री पर्वतराजी आणि पश्चिम घाट परिसरातही वाघांचे स्थानांतरण करण्याबाबत लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहिर  केले.

चराई कुरणांसाठी निधी कमी पडणार नाही

दुभच्या जनावरांच्या चराईसाठीच्या कुरण विकासाकरिता निधी कमी पडणार नाही, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.

व्याघ्र परिभ्रमण मार्ग परिसरासाठी वनीकरण केलेली जमीन घेण्याचा प्रस्ताव

वाघांच्या परिभ्रमण मार्गांसाठी (टायगर कॉरिडॉर) नवीन वनीकरण केलेली जमीन घेण्याचा प्रस्ताव असल्याचेही यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page