पोलीस भरती कंत्राटी स्वरूपात होणार नाही – फडणवीस…
मुंबई – मुंबई पोलीस दलामध्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्यात येणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन सादर केले आहे.
विधान परिषदेत निवेदन सादर करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस दलामध्ये कंत्राटी भरती करण्यात येणार नाही. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत भरती करण्यात येणाऱ्यांना विमानतळे किंवा आस्थापनांवर सुरक्षेसाठी ठेवतो. पण मागील तीन वर्ष भरती न झाल्याने आता मोठी भरती करण्यात येत आहे. पण यापेक्षा मोठी भरती आता करता येणार नाही कारण तितकी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे 18 हजारांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
18 हजारांपैकी काही हजार भरती प्रक्रिया ही पूर्ण झाली असून त्यांना आता प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणार आहे. ते प्रशिक्षणार्थी दीड वर्षांनंतर पोलीस दलात रुजू होतील. पण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे ज्याप्रमाणे पोलीस देतो, त्याचप्रमाणे पोलीस देण्यात येणार आहेत. त्यामुळे कुठेही पोलीस भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही, तो करण्याचा विचार देखील नाही, असेही फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.