सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई…

kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती फुल मार्केट मधील सिंगल युज प्लास्टिक वापरणा-या दुकानांवर धडक कारवाई करत सुमारे 500 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त केले आहे.
महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड़ यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील प्रदुषणात भर घालणा-या सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याच्या अनुषंगाने सिंगल युज प्लास्टिक विरोधी मोहिम तीव्र करण्याबाबतचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले होते. त्याअनुषंगाने हि कारवाई करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील फुल मार्केट मधील रामनाथ गुप्ता यांच्या फ्लॉवर शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिक आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, प्लास्टिकमुळे शहरातील पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे यापुढे सिंगल युज प्लास्टिकचा वापर आढळल्यास महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. आणि ही मोहिम अधिकाधिक तीव्र केली जाणार असून, यापुढे नागरिकांनी, व्यापारी संघटनांनी सिंगल युज प्लास्टिक ऐवजी कागद वा कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.