इक्बाल सिंह चहल यांना पदावरुन हटवले…

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल सिंह चहल यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना देखील हटवण्यात आले आहे.
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिला होता. या आदेशामुळे मुंबई चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. दरम्यान, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने त्यांना बदली आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारने यासंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाला पाठविले होते.मात्र आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली होती.
याशिवाय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे, मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांना हटवण्याचे आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालकांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.