ई-सिगारेटचा साठा करणाऱ्याविरुद्ध कारवाई…

मुंबई – ई सिगारेट विक्री करण्यासाठी साठा करून ठेवणाऱ्या एका इसमास अंमलबाजवणी कक्ष, गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून २,३७,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अशोक शामलाल कटारा असे याचे नाव आहे.
एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत महात्मा जोतिबा फुले मार्केट (कॉफेट मार्केट) मध्ये भारत सरकारने प्रतिबंधित केलेला इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा अनधिकृत साठा वितरण व विक्रीकरीता ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमलबाजवणी कक्ष, गुन्हे शाखा आणि एम.आर.ए. मार्ग पोलीस पथकाने छापा टाकला असता, कॉफेट मार्केट, सुविधा कलेक्शन, शॉप नं. ३२९ याठिकाणी परदेशी बनावटीचा ई-सिगारेटचा साठा विक्रीकरीता ठेवला असल्याचे दिसून आले.
सदर प्रकरणी २,२५,५००/- रु किंमतीचे विविध कंपनीचे ई-सिगारेट व त्याच्या फ्लेवरचा साठा व रोख रक्कम रू.१२,०००/- असा एकूण २,३७,५००/- किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच अशोक कटारा याच्यावर गुन्हा दाखल करून जप्त मुद्देमाल आणि त्याला पुढील कारवाईकरीता एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.