निर्भया फंडांतून घेतलेल्या गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी; राष्ट्रवादीचा आरोप…
मुंबई – महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून जयंत पाटील यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
जयंत पाटील यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा उल्लेख करत निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे असे पाटील यांनी म्हंटले आहे.
एकीकडे मा. मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्या सोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते, असेही जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.