चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी ११ पोलीस कर्मचारी निलंबित…
पुणे – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
चंद्रकांत पाटील एका कार्यकर्त्याला भेटून घरातून बाहेर आले आणि त्यावेळी पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
दरम्यान,या प्रकरणी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.