डोंबिवली – कमी किंमतीत फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून दिड कोटींची फसवणूक…

डोंबिवली – घर खरेदीदारांना कमी किंमतीत फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण १ कोटी ५५ लाख ५६ हजार रुपये उकळले. त्यानंतरच्या काळात फ्लॅट नाहीच पण भरणा केलेले पैसेही परत न मिळाल्याने पाच घर खरेदीदारांनी विकासका विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारी वरुन गुन्हा दाखल केला आहे. विश्वम प्राॅपर्टीचे व डिझाईन्सचे मालक मेहुल जेठवा, कल्पेश पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या विकासकांची नावे आहेत.
निखिल राजेंद्र देशमुख यांनी ही तक्रार केली आहे. विकासक जेठवा, पटेल यांनी ठाकुर्ली पूर्व भागातील श्री कृष्ण प्लाझा इमारती मधील बी ७०५ क्रमांक फ्लॅट आपण तुम्हाला कमी किंमतीत विकत देतो असे निखिल यांना सांगितले. या फ्लॅट खरेदीच्या बदल्यात विकासकांनी निखिल यांच्याकडून २४ लाख ६६ हजार ८०० रुपये वसूल केले. निखिल यांनी खरेदी व्यवहार करण्यासाठी विकासकांच्या मागे तगादा लावला. विविध कारणे देऊन विकासक टाळाटाळ करू लागले. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुढील तपास राम नगर पोलीस करत आहेत.