अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात – शरद पवार…

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे शरद पवार म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत.
मात्र, प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे. परंतु, आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
तसेच मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाबद्दल बोलताना पवार म्हणाले, उद्धव ठाकरे देखील समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, ती आमच्यासारखीच आहे.