mumbai : मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू…

mumbai – साकीनाका खैरनी रोड परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अस्लम शेख असे या व्यक्तीचं नाव असून, २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, साकीनाका येथील खैराणी रोडवरील ‘सन्मान हॉटेल’जवळून अस्लम अन्सारी हे जात होते. त्यावेळी ते मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असताना, त्यांचे लक्ष रस्त्यावरील उघड्या मॅनहोलकडे गेले नाही आणि ते थेट त्यात कोसळले. त्यानंतर अस्लम शेख मॅनहोलमध्ये पडल्याचे तिथे बाजूला काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली.आणि अस्लम शेख यांना मॅनहोलमधून बाहेर काढले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अस्लम शेख हे पडलेल्या जागेवरून थेट 15 ते 20 फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलच्या दिशेने वाहून गेले होते.
या घटनेनंतर साकीनाका परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.



