राज्यभरात एफडीएची धडक मोहीम; ७३ लाखांचा साठा जप्त…

mumbai – राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
‘औषधे व जादूटोणा विरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४‘ अंतर्गत राज्यभरात छापे
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पाडू” असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

आयुक्त मुंढे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये मोहीम राबवण्यात आली.
‘औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चा भंग केल्याप्रकरणी विभागनिहाय कारवाईमध्ये नागपूरमधील मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा रु. ७,२६,७५५/- चा साठा जप्त करण्यात आला.
नाशिक
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण रु. ७,१०,९४५/- किंमतीचा औषध साठा जप्त.
पुणे
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण १४,६८,९८१/- किंमतीचा साठा जप्त.
बृहन्मुंबई
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. १,८५,६००/- किमतीचा साठा जप्त.
कोकण विभाग
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. 18,58,०००/- किमतीचा साठा जप्त.
अमरावती
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा औषध निरीक्षकांच्या कारवाईत रु. १,४२,२२९/- किमतीचा साठा जप्त.
छत्रपती संभाजीनगर
मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण रु. ४८७१८/- किमतीचा साठा जप्त.
पुणे विभाग
तपासणीदरम्यान आढळलेल्या ०२ एलोपथी मिसब्रँडेड औषधांचा तब्बल रु. २१,८३,४२८/- चा साठा जप्त.



