खार पोलीस ठाण्यातील ४ पोलीस निलंबित…
MUMBAI – खार पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि त्याला अटक केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे. यात एका पोउपनिरीक्षकासह ३ कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, फुटेज तपासल्यानंतर अटक व्यक्तीला सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खार परिसरात ही घटना घडली असून, डॅनियल नावाच्या व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या खिशात २० ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा करण्यात आला होता.
त्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता एक व्यक्ती डॅनियलच्या खिशात काही तरी ठेवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने डॅनियलला सोडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता ते चौघेही खार पोलीस ठाण्यातील ‘दहशतवाद विरोधी सेल’ च्या पथकातील पोलीस असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, याप्रकरणी या पोलिसांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.