७५ किलो गांजासह कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त…
Ulhasnagar – मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोने मोठी कारवाई करत ७५ किलो गांजा आणि ४८०० कोडीन सिरपच्या बाटल्या असा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. उल्हासनगर येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय टोळीच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगरमधील एका कुरिअरच्या ऑफिसमध्ये धाड टाकली. आणि कोडीन सिरपच्या ४८०० बाटल्या जप्त करून एकाला अटक केली.
त्यानंतर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी परिसरात धाड टाकत ५ जणांना एका वाहनासह अटक केली. सदर वाहनात ७५ किलो गांजा मिळून आला. तसेच याप्रकरणी अटक ५ जणांकडून १ लाख १७ हजार ८६० रुपये देखील जप्त करण्यात आले.