बालविवाह प्रथा मोडीत काढण्यासाठी कठोर कारवाई…

thane – जिल्ह्यात बालविवाहाची सामाजिक कुप्रथा पूर्णतः मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी दिला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा दखलपात्र गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये संबंधित पालक, मध्यस्थ, विवाह सभागृहाचे मालक, धर्मगुरू, विवाह लावणाऱ्या व्यक्ती तसेच बालविवाहास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दोषींना कारावास व दंडाची तरतूद कायद्यात असून कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासावर गंभीर परिणाम होत असून समाजाने या सामाजिक कुप्रथेविरोधात एकत्र येणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, बाल संरक्षण यंत्रणा, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
बालविवाह प्रतिबंधामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती व प्रभाग बाल संरक्षण समिती यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बालकासंबंधी सर्व कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रतिबंधात्मक व उपाययोजनात्मक कार्य करणे हे या समित्यांचे मुख्य कार्य आहे. सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, स्थानिक सामाजिक प्रतिनिधी तसेच अंगणवाडी सेविका या ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य म्हणून ग्रामस्तरावर बालकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे तालुका व प्रभाग बाल संरक्षण समित्या प्रभावीपणे तालुका व प्रभागस्तरावर कामकाज करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, पोलीस विभाग, ग्रामपंचायत विभाग तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ग्रामीण व नागरी) यांच्या संयुक्त प्रयत्नातून जानेवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 15 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. आदिवासी भागातील शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांसह शहरी भागातही बालविवाहाची प्रकरणे आढळून येत असल्याने ग्रामीण व नागरी भागात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
अधिनियमानुसार ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून शहरी/नागरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या 431 ग्रामसेवक व 9 बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कार्य करीत आहेत.
कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार असल्याची किंवा झाला असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित चाईल्ड हेल्पलाईन 1098, नजीकचे पोलीस ठाणे, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी मुख्यसेविका, पोलीस पाटील किंवा बाल कल्याण समितीशी संपर्क साधावा आणि ठाणे जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.



