आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी टोळीवर मकोका…

kalyan – ओडिशातून गांजाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून महाराष्ट्रातील विविध शहरांत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी टोळीविरोधात ठाणे पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत दुसरी कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण १४ आरोपींवर मकोका लावण्यात आला असून, १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे व कल्याण वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात छापा टाकून छत्तीसगड नोंदणीच्या कार मधून गांजा विक्रीसाठी आलेल्या कार मधील एकाला अटक केली तसेच कार मधून ३५ किलो ४०० ग्रॅम गांजा, गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.
दरम्यान, या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागपूर, भिवंडी व ओडिशा येथील आणखी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या टोळी विरोधात नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत ४० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. तसेच संघटित पद्धतीने अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने मकोका लावण्यास परवानगी देण्यात आली.
सदर यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिरामसिंग परदेशी व त्यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. कल्याणजी घेटे करीत आहेत.



