विदेशी महिला जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली…
Sindhudurg – सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल या घनदाट जंगलात एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली आहे. एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, या महिलेची सुटका करण्यात आली आहे. तसेच तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हि महिला तामिळनाडूमधील रहिवासी असून, मूळ अमेरिकन नागरिक आहे. सोनुर्ली रोणापाल या घनदाट जंगलात तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. रोणापाल गावातील काही गुराखी नेहमीप्रमाणे आपली गुरं चारण्यासाठी जंगलातील काही भागांमध्ये घेऊन गेले होते. तिथे एका गुरख्याला हि महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर गुराख्यांनी याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. झाडाला बांधलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेला सोडून नंतर तिला रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस उपाशी असल्याने हि महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.