कल्याण शिळ रस्त्यावर नो पार्किंगचे आदेश…

ठाणे – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील कल्याण शिळ महामार्गावरील पत्रीपूल ते लोढा पलावा मार्गावर प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कल्याण शिळ मार्गावरील पत्रीपूल ते डोंबिवलीतील लोढा पलावा दरम्यान सध्याची वाहतुकीची परिस्थिती व वाहन पार्किंग करीता उपलब्ध असलेली जागा इत्यादीचे सर्वेक्षण करून रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग, सम-विषम पार्किंग याप्रमाणे वाहन पार्किंग जागेचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार, या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी खालील मार्गावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आले आहे.
नो पार्किंग :- कल्याण पूर्व पत्रीपूल ते डोंबिवली पूर्व लोढा पलावा दरम्यान कल्याण शिळ रोड रस्त्याचे दोन्ही बाजूम 9 कि.मी. 24 तास नो-पार्किंग करण्यात येत आहे.
मोती मिठाई चौक ते कावेरी चौक रस्त्याचे दोन्ही बाजूस 1 कि.मी. 24 तास नो-पार्किंग करण्यात येत आहे.
ही अधिसुचना प्रसिध्द झाल्या तारखेपासून 15 दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत आहे. या संदर्भात काही हरकत अगर सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त, शहर वाहतूक शाखा कार्यालय, तीन हात नाका, एल. बी. एस. मार्ग, ठाणे 400602 येथे पाठवाव्यात. याबाबत कोणाच्या काही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसुचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे उप आयुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे.