ठाणे

अंमली पदार्थाविरोधात पोलिसांची कडक कारवाई…

ठाणे – राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी पकडला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा पोलीस तसेच तीनही पोलीस आयुक्तालयांनी कठोर पावले उचलली असून रासायनिक कंपन्या, कारखाने, बंद पडलेली कारखाने, फार्म हाऊसेस आदी ठिकाणांबरोबरच संशयास्पद ठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

जिल्हा पोलिसांनी 231 कंपन्यांची तपासणी केली आहे. ठाणे जिल्हा अंमली पदार्थमुक्त ठेवण्यासाठी व जिल्ह्यात ड्रगला थारा मिळू नये, यासाठी पोलिसांसह विविध शासकीय यंत्रणांनी निर्धार केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राबविण्यात येत असून यासंबंधीचा आढावा जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती व जिल्हास्तरीय नार्कोकॉओर्डिनेशन समितीची संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अन्न व औषधे प्रशासनचे सहाय्यक आयुक्त (औषधे) रा. पं. चौधरी, सहाय्यक आयुक्त (अन्न) व्य. व. वेदपाठक, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक श्याम भालेराव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक चारुदत्त हांडे, कृषी उपसंचालक डी.एस. घोलप, टपाल विभागाच्या अमिता सिंह, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साळुंखे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह जिल्हा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात कोणत्याही मार्गाने ड्रगचा शिरकाव होऊ नये, यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या व संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले. बटण याऔषधाच्या विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. प्रत्येक विभागाने अंमली पदार्थांच्या विक्री, वितरण व उत्पादन निर्मिती यावर बारकाईने लक्ष द्यावे. या महिन्याभरात यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, पान टपऱ्या यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचेही निर्देश दिले.

एखाद्या कारवाईत अंमली पदार्थ सापडल्यास तो पदार्थ कोठून आला व पुढे तो कोठे पाठविण्यात येणार होता, याची माहिती शोधून अंमली पदार्थाची वाहतुकीची पाळेमुळे खोदून काढण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.

ग्रामीण भागातील फार्म हाऊस, गोदामे व कंपन्यांची तपासणी

जिल्हा पोलीस दलाने मागील पंधरा दिवसात ग्रामीण भागातील 231 कंपन्या, 111 गोदामे, 197 फार्म हाऊस यांची तपासणी केली आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील 18 व्यसनमुक्ती केंद्रांचीही तपासणी करण्यात आली.

औद्योगिक जागा, बंद पडलेल्या फॅक्टरीज, संशयास्पद जागा या ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यापुढील काळातही मोठ्या प्रमाणात तपासणी होणार असल्याचे देशमाने यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाने कोडीन सिरप, अल्पाझोलम, डायझपाम अशा गुंगीसाठी गैरवापर होणाऱ्या औषधांच्या संदर्भात जिल्ह्यातील 79 दुकानांची तपासणी केली असून तपासणीची कार्यवाही निरंतर सुरू ठेवली आहे. तीस उत्पादकांच्या तपासण्या केल्या आहेत. औषध विक्रेत्यांकडील खरेदी-विक्री व शिल्लक साठा तपशील जुळला नाही, अशा दुकानांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कारवाईत दहा महिन्यात 3 कोटींचा माल जप्त

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने दि.1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर या कालावधीत अंमली पदार्थाविरोधी कारवाईत 819 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून  740 किलो 647 ग्रॅम गांजा, 1 किलो 820 ग्रॅम मेफेड्रॉन, 12 हजार 719 कफ सिरप बाटल्या, 500 गोळ्या, 8 किलो 183 ग्रॅम चरस, 22 ग्रॅम वजनाचे एसएलडी पेपर, 13 ग्रॅम हेरॉईन पकडले आहे. एकूण 3 कोटी 93 लाख 74 हजार 858 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे.

पार्सलद्वारे येणाऱ्या अमंली पदार्थांवर विशेष नजर

परदेशातून टपालाद्वारे पार्सलच्या माध्यमातून अंमली पदार्थांची वाहतूक होत असते. अनेक वेळा परदेशी नागरिक हे चुकीचा पत्ता टाकून पार्सल मागवितात, मात्र पत्ता न सापडल्याने ते पार्सल टपाल कार्यालयात परत येते. हे गुन्हेगार टपाल कार्यालयात येऊन पार्सलवर चुकीने पत्ता चुकला असल्याचे सांगून ते पार्सल घेतात. त्यामुळे त्या पार्सलचा नेमका पत्ता नंतर लागू शकत नाही. अशा पार्सलवरही आता पोलिसांद्वारे बारीक नजर ठेवण्यात येत आहे. बाहेरील देशातून आलेल्या व चुकीचा पत्ता असलेल्या पार्सलवर विशेष नजर ठेवून संशयास्पद आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page