36 लाख 95 हजारांचे अंमली पदार्थ जप्त…

ठाणे – अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी 2023 पासून आता पर्यंत 84 जणांविरुद्ध 64 गुन्हे दाखल केले असून 36 लाख 95 हजार 955 रु. किमतीचा माल जप्त केला असल्याची माहिती कार्यकारी समितीच्या बैठकीत देण्यात आली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे शहर गुन्हे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजेंद्र शिरसाठ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. दिपक कुटे, टपाल विभागाचे पोष्टमास्टर प्रदीप तबाजी मुंढे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक गिरीश बने, सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे उपस्थित होते.
अमंली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने आयुक्तालयाच्या हद्दीत अंमल पदार्थांचा वापर, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. जानेवारी २०२३ ते आजपर्यंत 8 प्रकरणात 13 जणांना अटक करून त्यांच्याकडून 136 किलो 539 गांजा, एका जणांकडून 1 किलो चरस, 14 जणांकडून 337.28 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून अमंली पदार्थ सेवन करणाऱ्या 56 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अंमली पदार्थ विरोधी पथक अन्न व औषध विभागासोबत विविध ठिकाणी तपासणी करत आहे. अवैधरित्या विक्री होणाऱ्या कप सिरप विरुध्द व गांजा सेवन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात येणा-या एकूण १८ बंद रासायनिक कंपन्यांपैकी पाच बंद कंपन्यांची तपासणी करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उर्वरीत बंद रासायनिक कंपन्याची तपासणी लवकरात लवकर करण्याच्या सूचना मोराळे यांनी यावेळी दिल्या.
कुरीअर कंपन्याची बैठक आयोजित करून त्यांना कुरीयर मार्फत होणाऱ्या अंमली पदार्थाचे तस्करीचे अनुषंगाने मार्गदर्शन करण्याचे सुचना देण्यात आलेल्या आहेत. अंमली पदार्थाच्या दुष्परीणामांबाबत जनजागृती अभियान, शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्था या ठिकाणी प्रभावीपणे जनजागृती अभियान राबविण्याबाबत श्री. मोराळे यांनी सूचना दिल्या.
कारागृहात असलेल्या आरोपीकडून अंमली पदार्थाचे विक्री व पुरवठाबाबत गोपनीय स्त्रोतांमार्फत माहिती प्राप्त करून त्यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.