मुंबईत येणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनांची तपासणी…

mumbai – अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ०६ हजार ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ हजार ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईत मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दूध वाहनांच्या तपासणीत मुलुंड चेक नाका (पूर्व), हायवे, आनंदनगर येथे १३ वाहने एक लाख ४१ हजार ६० किंमतीचा २ हजार ८३३ लिटर दुधाचा साठा, मानखुर्द (वाशी) चेक नाका येथे ४१ वाहने ३१ हजार २०० किंमतीचा ९८ हजार २१५ लिटर दुधाचा साठा, दहिसर चेक नाका येथे १९ वाहने ५३ लाख ८६ हजार ३८० किंमतीचा ८ हजार ९७७ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे २५ वाहने ४० लाख ४८ हजार १९२ किंमतीचा ७३ हजार ३७२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यांचा समावेश होता. मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठविण्यात आल्याचे ही मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.