महसूल सहाय्यकाला ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले…
kalyan – कल्याण तहसील कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाच्या पथकाने ४० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. संतोष पाटील असे या महसूल सहाय्यकाचे नाव आहे.
कल्याण तालुक्यातील रायते येथील एका जमीन खरेदी प्रकरणात जमीन मालक शेतकऱ्याकडून संतोष पाटील यांनी ४० हजार रूपयांची लाच घेतली होती.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार शेतकरी यांनी कल्याण तालुक्यातील रायते गावी १० गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा सातबारा उतारा आणि फेरफार स्वतःच्या नावे नोंद होण्यासाठी शेतकरी महसूल कार्यालयात प्रयत्नशील होता. सातबारा, फेरफार नोंद होण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमीन खरेदीदार शेतकऱ्याकडे शेतकरी असल्याचा तहसीलदारांचा दाखला आवश्यक होता. त्याशिवाय ही नोंद होणार नाही असे खरेदीदाराला महसूल विभागाने कळविले होते.
खरेदीदार शेतकऱ्याने या दाखल्यासाठी आपल्या मूळ गावी असलेल्या उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तहसीलदारांचा दाखला मिळण्याची मागणी त्या कार्यालयाकडे केली होती. त्याप्रमाणे तो दाखल कल्याण तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. जमीन खरेदीदार शेतकऱ्याची शेतकरी दाखल्यासह सातबारा सदरी नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, असा प्रस्ताव रायते तलाठी यांना पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक संतोष पाटील यांनी शेतकऱ्याकडे ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही आपल्याकडे पैसे मागितले जात असल्याने जमीन खरेदीदार शेतकऱ्याने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, संतोष पाटील स्वतःसाठी २० हजार आणि वरिष्ठांसाठी २० हजार रूपये असे ४० हजार मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीएने सापळा टाकून कल्याण तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक कक्षाच्या पाठीमागील बाजूस शेतकऱ्याकडून ४० हजार रूपयांची लाच घेताना संतोष पाटील यांना रंगेहाथ पकडले.