देवीच्या चांदीच्या पादुका चोरणाऱ्यांना टिळक नगर पोलिसांनी केली अटक…
कल्याण- पूर्वेकडील कचोरे येथील गावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरणाऱ्या तिघांना अखेर टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. राजेश उर्फ राजू वंजारे, कैलास निषाद आणि फारुख अली मोहम्मद हनीफ शेख अशी या तिघांची नावे आहेत.
हा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. दुपारच्या सुमारास दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा देवळात शिरला., त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा दुसरा चोरटा आतमध्ये आला. त्यानेही देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. आणि मग देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या चांदीच्या पादुका उचलल्या आणि त्यांनी तेथून पळ काढला होता. दरम्यान, हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
त्यानंतर देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या तिघांना अटक केली. आणि चोरी केलेल्या ३० हजार रु. किंमतीच्या चांदीच्या पादुका हस्तगत केल्या.
हि यशस्वी कामगिरी टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जगन्नाथ शिंदे, सहा. फौ. सोनवणे,पोह. पगारे,पवार, पोशी. राजपूत, सपकाळे, राठोड यांनी केली आहे.