नवजात बालकांची विक्री करणारी टोळी अटकेत…

मुंबई – नवजात बालकांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील डॉक्टरसह सात एजंटना गुन्हे शाखा कक्ष २ पोलिसांनी अटक करुन २ बालकांची सुटका केली आहे. वंदना पवार, शितल वारे, स्नेहा सुर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर, डॉ. संजय खंदारे अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत.
कन्नमवार नगर परिसर, विक्रोळी (पूर्व) येथून एका ५ महिन्याच्या बाळाला शितल वारे हिने विक्री केली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी शितल वारेचा शोध घेऊन तिला गोवंडी परिसरातून अटक केली आणि तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने ५ महिन्याच्या बाळाची विक्री डॉ. संजय सोपानराव खंदारे (बी.एच.एम.एस) व वंदना पवार यांच्यामार्फत संजय पवार आणि सविता पवार यांना २,००,०००/- रुपयांमध्ये विक्री केली असल्याचे सांगितले. त्याआधारे पोलिसांनी डॉ. संजय खंदारे व वंदना यांना ताब्यात घेऊन विक्री केलेल्या ५ महिन्याच्या बाळाची गुहागर, रत्नागिरी येथून संजय पवार आणि सविता पवार यांच्या ताब्यातून सुटका केली.
तसेच शितल वारे हिने तिचे एजंट साथीदार शरद देवर व स्नेहा सुर्यवंशी यांच्या मदतीने २ वर्षाची मुलगी २,५०,०००/- रुपयांमध्ये विक्री केल्याची आणखी माहिती समोर आल्याने सदर विक्री केलेल्या २ वर्षाच्या मुलीची सुटका देखील पोलिसांनी केली आहे.
दरम्यान, या टोळीने दलाल, साथीदारांमार्फत नवजात बालकांची तेलंगणा, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्हयात व राज्यात लहान मुलांची विक्री केली असल्याची माहिती समोर आली आहे.