एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप…

मुंबई – एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना लखनभैय्या फेक एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाने शर्मा यांना दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रदीप शर्मा यांना येत्या ३ आठवड्यात आत्मसर्पण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसातील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.