डोंबिवलीत रिक्षा चालकाची आत्महत्या…

dombivali – डोंबिवलीत एका ७० वर्षीय रिक्षा चालकाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोठा गाव परिसरात कार आणि रिक्षाचा अपघात झाल्यानंतर रिक्षाचालकाने आत्महत्या केली. कारचालकाने रिक्षाचालकाला मारहाण करून २ लाख रुपये मागितले त्यानंतर या मानसिक त्रासातून रिक्षाचालकाने आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकाकांकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंजाजी शेळके असे या रिक्षा चालकाचे नाव असून, मोठा गाव परिसरात मुंजाजी शेळके हे रिक्षा चालवत असताना त्यांनी एका कारला धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर कार चालकाने शेळके यांना पकडून ठेवलं. त्यानंतर त्यांना खूप मारहाण केली. पहाटे ३ वाजता त्यांना घरी सोडले. मात्र त्यावेळी कार चालकाने शेळके यांच्याकडून २ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली. त्यामुळे आता दोन लाख रुपये कुठून आणायचे? या विचाराने मुंजाजी शेळके त्रस्त झाले आणि त्यांनी आत्महत्या केली.
दरम्यान, याप्रकरणी शेळके यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तसेच विष्णू नगर पोलीस चौकशी करत आहेत.