डोंबिवलीत २ कोटीच्या खंडणीसाठी ७ वर्षीय मुलाचे अपहरण …

dombivali – २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका ७ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले असल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही तासातच या ७ वर्षाच्या मुलाची शहापूर येथून सुटका करून त्या मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. तसेच दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत राहणारे महेश भोईर यांचा मुलगा कैवल्य भोईर हा सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला असता थोड्या वेळाने रिक्षाचालक विरेन पाटील याने कैवल्यला काही लोक रिजेन्सी अंनतम येथून पळवून घेऊन गेले आहेत. ते कोण होते हे मला माहिती नाही. असे महेश भोईर यांना सांगितले. त्यानतंर महेश भोईर यांना तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मुलगा हवा असल्यास २ कोटी रुपये द्या असा फोन आला. महेश यांनी तात्काळ मानपाडा पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार केली.
सदर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास करून शोध घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे शहापूर पोलिसांच्या मदतीने कैवल्यची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांना रिक्षा चालक विरेन पाटीलवर संशय होता. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता सदर गुन्हयात आपण सहभागी असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
सदरची यशस्वी कामगिरी डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरिक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड यांच्या नेतृत्वात चार तपास पथकांनी केली.