SSC Result : राज्यात 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण…

mumbai – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून, राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. तसेच कोकण विभागाचा निकाल (97.62 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) आहे.
या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 92.09 इतकी आहे.
मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक
दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण 8,20,427 मुलांपैकी 7,34,814 मुले (89.56 टक्के) तर एकूण 7,22,045 मुलींपैकी 6,85,672 मुली (94.96 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47 टक्के, मुंबई- 94.97, पुणे- 94.24, नाशिक- 90.53, अमरावती- 90.50, नागपूर- 89.07 तर लातूर विभागाचा निकाल 88.42 टक्के लागला आहे.
श्रेणीनिहाय निकाल
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 27.41 टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण 31.26 टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये 24.66 टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 8.75 टक्के इतके आहे.



