डोंबिवलीत विद्यार्थ्यांना मारहाण…

डोंबिवली – एका शिक्षिकेने काही विद्यार्थ्यांना लाकडी, स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केल्याची घटना जोंधळे विद्यामंदिर शाळेत घडली आहे. या मारहाणीत काही मुले जखमी झाली असून त्यांच्या अंगावरही मारहाणीचे वळ उठले आहेत.

दरम्यान, या घटने नंतर मुलांच्या संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत मुख्यध्यापकांना जाब विचारला असता शाळा व्यवस्थापनाने या प्रकाराबाबत माफी मागत संबंधित शिक्षकेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. निलिमा भारमळ असे या शिक्षकेचे नाव असून त्या तीन ते चार दिवसांपूर्वीच या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या असल्याबाबत माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर हि शिक्षिका अजूनही समोर आली नसून तिचा बायोडाटा देखील नाही. त्यामुळे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत नेमकं कोणी तिला त्या शाळेत रुजू केले आणि मुलांना इतक्या गंभीररित्या का मारलं? याकडे शाळा व्यवस्थापनाचे लक्ष नव्हते का? या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या शिक्षकांची भरती शाळेत होत असेल तर आमचे पाल्य शाळेत नक्की सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पालकांना आता पडला आहे आणि जर पुन्हा असे काही घडले तर याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवालही पालक विचारत आहेत.