कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत बांधकाम माफियांनी लढवली शक्कल…

डोंबिवली – बेकायदा इमारत तोडण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे पथक गेले असता अनधिकृत बांधकाम माफियांनी कारवाई टाळण्यासाठी इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यात चारचाकी गाड्या उभ्या केल्या होत्या. या गाडीच्या मागच्या बाजूस गाडी बंद पडली आहे. दुपार पर्यंत काढण्यात येईल, सोसायटीच्या रहिवाशांना त्रास दिल्याबद्दल क्षमा असावी कृपया सहकार्य करावे असा स्टीकर चिकटवण्यात आला होता. या गाड्यांमुळे वाहने इमारतीपर्यत पोचण्याचा मार्ग बंद झाल्याने महापालिकेच्या पथकाला बराच वेळ तेथेच थांबावे लागेल. पण सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी टोईंग व्हॅनच्या मदतीने या गाड्या बाजूला करत सदर बांधकामावर कारवाई सुरू केली.

कुंभारखाणपाडा परिसरातील मॉर्डन इंग्लीश स्कूल आणि दिशांक सोसायटीच्या नजीक असलेल्या आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाच्या विरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेचे पथक त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. परंतु टोईंग व्हॅनच्या मदतीने या गाड्या बाजूला करत मशिनरी जागेवर नेत कारवाई सुरु करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी गुप्ते यांनी दिलेल्या तक्ररारीवरून संबधित इमारत मालकाविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.