ठाणे

ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई…

thane – ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निष्कासन विभागाने विविध प्रभाग समिती क्षेत्रांमधील शाळा परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर विशेष कारवाई मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत विविध प्रभाग समिती क्षेत्रांतील एकूण ५३ अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला.

सिडको येथील बेडेकर महाविद्यालयासमोरील टपरी, महागिरी येथील ठाणे पोलीस स्कूलसमोरील टपरी, तसेच एन.के.टी. महाविद्यालयासमोरील टपरी, जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराशेजारील टपरीवर कारवाई करण्यात आली असून या सर्व टप-यावरून गुटखा , पानमसालाजन्य पदार्थ, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

चरई येथील दगडी स्कूलसमोरील,चरई येथील महाराष्ट्र विद्यालयासमोरील टपरीवरून पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेट जप्त करण्यात आल्या. तसेच राम मारुती रोड येथील शिव समर्थ स्कूलसमोरील टपरीवरही कारवाई करण्यात आली.

ठाणे महानगरपालिका शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तसेच अनधिकृत टपऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू ठेवणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नौपाडा कोपरी- २१ पानटपरी
वर्तकनगर – ०२ पानटपरी, ०२ हातगाड्या
उथळसर – ०२ पानटपरी, ०५ हातगाड्या
कळवा – ०१ पानटपरी, १० हातगाड्या
मुंब्रा – ११ पानटपरी, ०८ हातगाड्या
माजिवडा मानपाडा – ०७ पानटपरी, १२ हातगाड्या
दिवा – ०२ पानटपरी, ०५ हातगाड्या
लोकमान्य सावरकर – ०७ पानटपरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page