डोंबिवलीत मराठी कुटुंबाला मारहाण…
dombivali – कल्याणमध्ये दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीत अशीच एक घटना घडली आहे. परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला पुन्हा एकदा बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली ते कुटुंब एका पोलीस कर्मचाऱ्याचे होते.
उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्या पत्नीनं देखील मारहाण केली आहे. तर यात पोलीस कर्मचारी त्याची पत्नी आणि आईला मराहाण करण्यात आली आहे, या घटनेत हे तिघेही जखमी झाले आहेत. एका ९ वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून, त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या या तिघांना मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रीना उत्तम पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची ९ वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना उत्तम पांडे तिथे आला आणि त्यानं मुलीला जबरदस्तीनं घरात ओढत नेलं. त्यानंतर त्यानं मुलीच्या चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. मुलीने संपूर्ण घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीय उत्तम पांडेच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रीना पांडे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली असता, मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राम चोपडे करत आहेत.