शिवीगाळ केली म्हणून हत्या; ठाण्यातील हत्येचा अखेर उलगडा…
thane – ठाण्यातील कोलशेत परिसरात एका सुपरवायझरची शीर छाटून हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी इमारतीतील लिफ्टमनला अटक केली आहे. प्रसाद कदम असे याचे नाव असून, सुपरवायझरने शिवीगाळ केल्याने त्याने हि हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, कोलशेत येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. या इमारतीच्या गच्चीवर सफाई कर्मचारी गेले असता, त्याठिकाणी सुपरवायझर सोमनाथ सादगिरी यांचा मृतदेह त्यांना आढळून आला होता. त्याचे शीर धडावेगळे झाले होते. सदरबाबत कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाच (वागळे इस्टेट) कडून सुरू होता.
गुन्ह्याच्या अनुषंगाने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाच (वागळे इस्टेट) पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रसाद कदम याला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली असून, सोमनाथ याने प्रसाद याला आईवरून शिवीगाळ केली होती. या रागातूनच त्याने सोमनाथची धारदार शस्त्राने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.