घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त…

नवी दिल्ली – ओनम आणि रक्षा बंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे २०० रुपयांपर्यत कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिले आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ७५ लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल.
तसेच उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी २०० रुपये अनुदान होते, तर त्यावर २०० रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना ४०० रुपये अनुदान मिळणार आहे. ३३ कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर ७५ लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत.