महाराष्ट्र

शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं…

dhule – धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं असल्याची माहिती समोर आली आहे. यातील रुम नंबर १०२ मधून तब्बल १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.

या शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी ५ कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील रुम नंबर १०२ ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. तसेच, ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी, अशी मागणीही गोटे यांनी केली होती.

अखेरीस पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रुमचे कुलूप तोडण्यात आले त्यावेळी त्याठिकाणी तब्बल एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांची रोकड मिळून आली. सदर रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर १०२ बुक करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. एकूण २९ आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, या आमदारांना देण्यासाठीच पाच कोटी रुपयांची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page