नवी मुंबईत सराफाच्या दुकानात दरोडा…
नवी मुंबई – खारघरमधील एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत आणि हवेत गोळीबार करत दुकानातील लाखोंचे दागिने लंपास केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एम.बी.ज्वेलर्स असे दरोडा टाकण्यात आलेल्या सराफा दुकानाचे नाव असून, हे दुकान खारघर सेक्टर ३५ येथे आहे.
रविवारी रात्री ११ च्या सुमारास ३ दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते. तर हातात बंदूक होती. त्यातील एकाने दुकानातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांनी दुकानातील दागिने बॅगेत भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरु आहे.