भाऊ तुझी लढाई चालू ठेव, मोरेंच्या राजीनाम्यावर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया…
पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वसंत मोरे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच भाऊ तुझी लढाई चालू ठेव. तुझ्यासाठी बहिणीचे दरवाजे कायम उघडे आहेत असे त्या म्हणाल्या.
मोरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना रुपाली पाटील म्हणाल्या की, लोकहितासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता काम करत असताना त्याची होणारी कुचंबणा, त्याला थांबवण्यासाठी केलेले अडथळे या गोष्टी अनेक वर्षे वसंत मोरे यांनी सहन केल्या आहेत. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कण्यासहित मोडून टाकला जातो. भाऊ तुझी लढाई चालू ठेव. तुझ्यासाठी बहिणीचे दरवाजे कायम उघडे आहेत हे लक्षात ठेव. वसंत मोरेंनी राजीनामा देऊन योग्य निर्णय घेतला आहे. वसंत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपले स्वागतच असेल.