डोंबिवलीत तरुणीवर सामूहिक अत्याचार…
डोंबिवली – तरुणीच्या मित्राला दारु आणण्यासाठी पाठवून तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना कुंभारखाणपाडा येथे घडली आहे. सदर प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दिनेश गडारी याला अटक केली असून त्याचा साथीदार सुनील राठोड याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात पीडित तरुणी तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहते. ती तिचे राहते घर सोडण्याच्या तयारीत होती. तरुणीने तिचे घरातील सामान बांधून ते परिचित असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. सामानाची बांधबंदिस्ती आणि आता सामान कधी इतरत्र हलविणार याची चौकशी करण्यासाठी तरुणीचा मित्र दिनेश गडारी आणि सुनील राठोड तरुणीने सामान ठेवलेल्या घरी आले. त्यावेळी तरुणीचा मित्र आणि तरुणी घरात होते.
तरुणी आणि तिचा मित्र अन्य भागात स्थलांतरित होणार आहेत. एक मेजवानी म्हणून दिनेश, सुनील यांनी तरुणीच्या मित्राला दारू आणण्यास सांगितले. तो दारू आणण्यासाठी घराबाहेर पडताच, तरुणी घरात एकटीच आहे ही संधी साधून दिनेशने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दिनेशशी प्रतिकार करुन तरुणी घराबाहेर येऊन बचावासाठी पळू लागली. सुनीलने तरुणीचा पाठलाग करुन तिला पकडले. तिला एका रिक्षेत जबरदस्तीने बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दिनेश गडारी याला अटक केली.