मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास जलद…

mumbai – दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-७ शी जोडली गेल्याने प्रवाशांना अधिक चांगली संलग्नता मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उद्घाटन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सुमारे ६,६०७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या एक ते दोन तास लागणारा प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही मेट्रो लाईन-३ शी जोडली जाणार असून, मीरा भाईंदर ते कुलाबा दरम्यान सीमलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मेट्रो सेवेत कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले असून, सध्या ८० टक्के तिकीट व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. स्मार्ट कार्ड आणि ‘वन कार्ड’ प्रणालीमुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळत आहे. हा प्रकल्प सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लाईटिंग आणि रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे हरित प्रकल्प ठरत आहे. तसेच नागपूरप्रमाणेच मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर उभारण्याची डबल डेकर रचना येथेही वापरण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईत १०० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून, देशात दिल्ली नंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत आणखी प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईतील मेट्रो जाळे अधिक विस्तारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीए, संबंधित महानगरपालिका, कंत्राटदार आणि मजूर यांचे योगदानाबद्दल आभार मानून ही मेट्रो सेवा मुंबईकरांना समर्पित केली असल्याची घोषणा केली.



