मुंबई

परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई…

mumbai – पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १ कोटी ८९ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पनवेल-मुंब्रा हायवेवरील दहिसर मोरी परिसरातून परराज्यातील अवैध मद्याची मोठी खेप नेली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने दहीसर मोरी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर सापळा रचला. आणि काही वेळातच संशयित ट्रक अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने ट्रकमध्ये वाहनांचे सुटे भाग भरलेले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्की माहिती असल्याने पथकाने ट्रकची ताडपत्री काढून कसून तपासणी केली.

तेव्हा अधिकाऱ्यांना खाकी रंगाचे शेकडो बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडले असता त्यात गोवा राज्यात निर्मिती झालेल्या ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचा साठा सापडला. विशेष म्हणजे या बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचा बॅच नंबर अथवा कमाल विक्री किंमत छापलेली नव्हती. महाराष्ट्र राज्यात या मद्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. पोलिसांनी ट्रकमधून एकूण १५३० बॉक्स जप्त केले, ज्यामध्ये ७३,४४० दारूच्या बाटल्या होत्या.

या प्रकरणी ट्रक चालक प्रविण किशनलाल कुमार याला अटक केली. या कारवाईत आयशर ट्रक, ७३ हजारहून अधिक दारूच्या बाटल्या आणि एक मोबाईल फोन असा एकूण १,८९,६६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रवीण कुमार विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page