अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या…
ambarnath – अंबरनाथ पूर्वेत बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवगंगा नगर परिसरातील शिवमंदिर रोडवर ही घटना घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास संजय पाटील यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. संजय पाटील कार पार्क करून कोणाशी तरी बोलत असताना अचानक काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरज पाटील आणि हर्ष पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हददीतील संजय पाटील यांनी १९ वर्षापुर्वी अतिरिक्त एम.आय.डी.सी., अंबरनाथ पुर्व येथे शांताराम पाटील यांच्याकडून अंदाजे ५ एकर जमिन विकत घेतली होती. त्यांनतर शांताराम पाटील यांनी सदर जमिन दुसऱ्या लोकांना विक्री केली असल्याने, सदर जमीनीच्या मालकीवरून विलास पाटील, सुरज पाटील, हर्श पाटील यांच्यासोबत संजय पाटील यांचा वाद सुरु असल्याने सदर जमीनीच्या वादातून सुरज पाटील आणि हर्ष पाटील या दोघांनी संजय पाटील यांची धारदार शस्त्राने हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.